बंगळूरु :सर्फराज खानच्या झुंजार शतकी खेळीमुळे मुंबईने रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यातील पहिल्या डावात ३७४ अशी समाधानकारक धावसंख्या उभारली. त्यानंतर मध्य प्रदेशने गुरुवारी दुसऱ्या दिवसअखेर १ बाद १२३ असे चिवट प्रत्युत्तर दिले.
सर्फराजने यंदाच्या रणजी हंगामातील चौथे शतक झळकावताना २४३ चेंडूंत १३४ धावा केल्या. त्यामुळे ५ बाद २४८ धावसंख्येवरून दुसऱ्या दिवसाला प्रारंभ करणाऱ्या ४१ वेळा विजेत्या मुंबईला तग धरता आला. दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला, तेव्हा मध्य प्रदेशचा संघ २५१ धावांनी पिछाडीवर आहे. यश दुबे ४४ आणि शुभम शर्मा ४१ धावांनी खेळत असून, या जोडीने दुसऱ्या गडय़ासाठी ७९ धावांची अविरत भागीदारी केली आहे. तुषार देशपांडेने सलामीवीर हिमांशू मंत्रीला (३१) बाद करण्यात यश मिळवले आहे.
दुसऱ्या दिवसावर सर्फराजने वर्चस्व गाजवले. त्याच्या खेळीत १३ चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता. यंदाच्या हंगामात सर्फराजच्या खात्यावर सहा सामन्यांत ९३७ धावा जमा असून, दुसऱ्या डावात मुंबईला पुन्हा फलंदाजीची संधी मिळाल्यास तो एक हजार धावांचा टप्पा गाठू शकेल.
दिवसाच्या पहिल्याच षटकात गौरव यादवने (४/१०६) शम्स मुलानीला (१२) पायचीत केले. परंतु तळाच्या फलंदाजांच्या साथीने सर्फराजने हिमतीने किल्ला लढवला. २०१९-२०च्या रणजी हंगामातही सर्फराजने ९२८ धावा केल्या होत्या. मात्र शिस्तभंगाच्या कारवाईमुळे त्याला एका हंगामासाठी मुंबईकडून खेळता आले नव्हते.
संक्षिप्त धावफलक
मुंबई (पहिला डाव) : १२७.४ षटकांत सर्व बाद ३७४ (सर्फराज खान १३४, यशस्वी जैस्वाल ७८; गौरव यादव ४/१०६, अनुभव अगरवाल ३/८१)
मध्य प्रदेश (पहिला डाव) : ४१ षटकांत १ बाद १२३ (यश दुबे खेळत आहे ४४, शुभम शर्मा खेळत आहे ४१; तुषार देशपांडे १/३१)
’ वेळ : सकाळी ९.३० वा.
’ थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स २
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]
#ranji #trophy #final #Sarfarazs #century #puts #mumbai #dominant #position #zws #रणज #करडक #करकट #सपरध #सरफरजच #झजर #शतक