Thursday, May 26, 2022
Home मुख्य बातम्या दिल का दिया जलाके गया..

दिल का दिया जलाके गया..मृदुला दाढे-जोशी

संगीतकार चित्रगुप्त यांचं स्मरण एरवी दुर्मीळच.. त्यांचा स्मृतिदिन १४ जानेवारीला होता, तेव्हा तरी या गुणी संगीतकाराची आठवण किती दर्दिंना आली असेल?

सुंदर चित्राप्रमाणे चालीलाही ‘तोल’ असावा लागतो. शिल्पाकृतीप्रमाणे ‘आकार’ असावा लागतो. रंगसंगतीत साधल्या जाणाऱ्या विरोधाभासाची सीमारेषा ओळखावी लागते. अशा चाली नाचऱ्या असल्या तरी उच्छृंखल नसतात. गंभीर असल्या तरी रडक्या नसतात. प्रणयोत्सुक असल्या तरी कामुक नसतात. लाजऱ्या असल्या तरी मुग्ध नसतात. खूप बोलतात.. चमकदार डोळय़ांतून! अशा गाण्यांत गायकाच्या आवाजाची धार बोचरी नसते. त्यात विलक्षण सोज्वळपणा असतो. हा ‘तोल’ सांभाळणारे संगीतकार म्हणजे चित्रगुप्त! रसिकांच्या भावविश्वात त्यांच्या चाली फार हळव्या जागी रुतून बसल्या आहेत. मध्यमवर्गीय घरेलूपणा हा या गाण्यांचा स्थायिभाव आहे. स्वभावातला कुटुंबवत्सल भाव चालींत उतरला आहे.

चित्रगुप्त हे नाव खरं तर प्रा. चित्रगुप्त श्रीवास्तव असं लिहायला हवं. १६ नोव्हेंबर १९१७ साली बिहारमधल्या गोपालगंज (कमरेनी) इथं चित्रगुप्तांचा जन्म झाला. पं. शिवप्रसाद त्रिपाठी यांच्याकडून शास्त्रोक्त संगीताचं पायाभूत शिक्षणही घेतलं. पाटणा विद्यापीठातून अर्थशास्त्र घेऊन एम.ए. करणारा, प्राध्यापक असणारा हा पहिलाच आणि किंबहुना एकमेव संगीतकार! १९४५ साली मुंबईत येऊन हळूहळू संगीत क्षेत्रात उमेदवारी करत असताना एस. एन. त्रिपाठींकडे साहाय्यक म्हणून काम मिळालं. ‘भाभी’ (१९५७) या अत्यंत सुरेख कथा आणि संगीत असलेल्या चित्रपटाने चित्रगुप्तांना एक निराळी, नवी पहचान दिली.

‘लता’ नावाचा एकच आवाज किती संगीतकारांच्या शैलींतून अवतरला! अनेक प्रकारचे ‘टोन्स’, हरकतींच्या कोनाकोनातूनसुद्धा वैविध्य दाखवण्याच्या लोकोत्तर क्षमतेमुळे अनेक संगीतकारांचं घराणं एकच असलं तरी ती शैली स्वत:चा वेगळेपणा दाखवू शकली. गोडव्याच्या छटा हजारो! वात्सल्याची, प्रियतमेची, प्रेमळ कर्तव्यदक्ष पत्नीची! कित्येक वेळा या गोडव्याचा अतिरेक होऊ न देण्याचीसुद्धा खबरदारी घ्यावी लागते. मग मींडेतून आलेल्या साखरपाकाची मिठी काढायला एखादी धारदार फ्रेज योजावी लागते. अन्यथा ‘हाय रे तेरे चंचल नैनवा’मधल्या ‘हाय’वरच मिठी बसेल! तो गोडवा बॅलन्स करायला, पुढच्या ओळीतल्या ‘बात’वर एक हरकत नको का? ‘कारे कारे बादरा जारे जारे बादरा, मेरी अटरिया न शोर मचा’ मधल्या ‘मचा’वर काय असतं नेमकं? ठेका, तिथेच कसा काय मिळतो? ‘कारे कारे’ या चारही अक्षरांना आस देत खाली आणण्याची शैली खास चित्रगुप्ती! फक्त गंमत म्हणून एक विचार करून पाहा. ही चार अक्षरं ओपींनी स्टिकॅटो (staccatto) म्हणजेच तुटक पद्धतीने बांधली असती. चित्रगुप्त ती आस ठेवतात, कारण ती  मेलडीला आणखी गोड बनवते. ओपींना त्यातला रिदम पकडायचा असतो आणि चित्रगुप्तांना मेलडी!

‘दिल को लाख संभाला जी’ हे शब्द किती प्रवाही! त्यात त्या ‘जी’नं आणलेला तो गोडवा पुढे पूर्ण गाण्यात पाझरतो. पहिल्या दोन ओळी एकसारख्या चालीच्या झाल्यावर, ‘कल तक मेरा’ या ओळींना होणारा बदल खूप मेलोडियस, कारण तिथे चाल मंद्रात जाते. आणि ‘मेरा था’ या शब्दांना निषादावर स्थिरावते. तो निषाद इतका महत्त्वाचा, की त्यावरूनच पुढे मध्यमापर्यंतची सुरेख फ्रेज, ‘आज फिर तेरा हो गया’ या ओळीवर तोललीय. गाण्याला एक सांगीतिक आकृती ही अशा विश्रामामुळे आणि त्या ओळीच्या पुढच्या दिशेने मिळत असते. फार खोल विचार, पण उत्कृष्ट संगीतकारासाठी अशक्य काहीच नाही. लताबाईंचे ‘गोड उच्चार’ सगळय़ात सुंदर वापरले चित्रगुप्तांनी. चिकुनम, अटरिया, ‘हम तडप तडपकर’ यातला एक एक शब्द नीट ऐकला तर हा गोडवा अंगावर सुखाचा काटा आणतो.

‘तडपाओगे, तडपालो! हम तडप तडप कर भी तुम्हारे गीत गायेंगे.’ हे तर वरवर पाहता एक गद्य वाक्यच वाटतं. तो ‘तडप तडप’वरचा पंचम किती अनाघ्रात, किती स्वच्छ! या शब्दांसाठीच तो स्वर जन्माला आला असेल का? या सहा अक्षरांत, एकाही अक्षरावर तो स्वर, पाव मायक्रो सेंटीमीटरदेखील हलत नाही की त्याचं वजन कमी होत नाही. ‘तडप’, ‘ठोकर’ हे तर कठोर शब्द ना? आणि ‘ठोकर’ तर अर्थानेही कठोर! पण तोसुद्धा शहाळय़ातल्या मलईसारखा, मुलायम, कानामध्ये हुळहुळेल इतका गोड. ‘तडपालो’चा उच्चार कधी लटक्या रागाने, कधी प्रेमाने, कधी समजावत केलेला आणि सगळय़ात महत्त्वाचं म्हणजे, शुभा खोटेंच्याच आवाजात ऐकतोय असा वाटण्याइतपत लताबाईंनी वेगळा आवाज लावलाय.

‘हाय रे तेरे चंचल नैनवा’ म्हणजे पहिल्या शब्दापासूनच एक तहान वाढवणारी तृप्ती! ‘हाय’ या शब्दामुळे ऐकणारा पूर्णपणे ट्रान्समध्ये जाऊ शकतो; पण पुढचं गाणं ऐकायची तहान त्या तृप्तीतूनच जन्माला येते. ‘हाय’ शब्दातून जगला- वाचलात तर पुढे ‘चंचल’चं टायिमग, त्याचा उच्चार, हे सगळं अनुभवायचं! ‘चंचल’ ही या गाण्याची ‘सम’ आहे. ‘बस डोले, न कुछ बोले, पलकों से मुस्काये..!’ किती सुंदर शब्द! डोळय़ातून हसणं माहीत होतं, पण पापण्यांतून? क्या बात है! आणि ‘मुस्काये’ आणि ‘हाये’ हे शब्द आस घेत एकसंध होतात, तुम्ही त्या ‘समेवर’ कसे आलात हे तुमचं तुम्हालाच कळत नाही अशी ‘आस’ ठेवणं, हीच शैली होती.

चित्रगुप्तांचं लताबाईंना दिलेलं सगळय़ात सुंदर गाणं म्हणजे ‘दिल का दिया जला के गया!’ या अशा आवाजातील बाईंचं हे एकमेव गाणं असावं! एकदा अस्फुट आवाजात, सलीलदांकडे ‘मेरे मन के दिये’ त्या गायल्यात, पण या गाण्याचा मूडच वेगळा. तो संपूर्णपणे आतला, खासगी! कधी कधी सुखाचे क्षण, एकांतात स्वत:शी अनुभवतानाही भीती वाटते. ते सुख इतकं खासगी असतं. स्वत:चीच दृष्ट लागायची त्याला मोठय़ाने व्यक्त केलं तर! स्वत:चं बोलणं स्वत:ला ऐकू गेलं तरी मोहरून जाऊ आपण. त्यापेक्षा कुजबुजण्यातच मजा आहे. हा आवाज इतका कोवळा, अगदी केळीच्या आतल्या गाभ्याइतका अस्पर्श!

काँपते लबों को मै खोल रही हूँ 

बोल वही जैसे के बोल रही हूँ

बोल जो डूबे हैं कहीं इस दिल की गहराई में!

मजरूहजींच्या या काव्यातच या आवाजाचं मर्म आहे. ‘कारे कारे बादरा’सारखं गाणं मल्हाराच्या कुशीतून येतं. ‘मेरी अटरिया’पासून ते ‘कारे कारे बादरा’पर्यंतच्या ओळी, बाई एका श्वासात गायल्या आहेत. तेही खालच्या ‘बादरा’ला पूर्णपणे खालच्या पंचमाकडे सुखरूप सोपवून! ‘बैरी मै तो सोयी थी’ यातला ‘सोयी’ शब्द कैकदा ऐकावा. नाहीच समाधान होत. अशा वाईट सवयी कानांना लागल्या की सगळं अवघड होऊन बसतं!

‘ये पर्बतों के दायरे’ या गाण्याचाही नूर काही और आहे. एक धूसर संध्याकाळ. जाणवणारी तगमग कुठे तरी संपावी असं अनिवार आकर्षण. एकमेकांच्या अस्तित्वाची ओढ एक धूसर सीमारेषा ओलांडू पाहतीय; पण हे प्रेम शरीरापासून सुरू होऊन शरीरात संपणारं नाही. दोन आत्म्यांचं मीलन केव्हाच झालंय, मग सर्वार्थानी का नाही एकरूप व्हायचं? अशी ती संभ्रमावस्था आहे. खूप सुंदर चाल मिळाली की शब्दातला आतला अर्थ बाहेर येतोच. ‘जरा सी जुल्फ खोल दो, फिजा में इत्र घोल दो.’ काय अंदाज! साहिरजींच्याच ‘जुल्फ शाने पें मुडी, एक खुशबू सी उडी. खुल गये राज कई’ या ओळींची आठवण यावी! के फासला न कुछ रहे हमारे दरमियाँ..!  आता कुठलंच अंतर नको. या ‘फासला’ शब्दावरच ‘सा’ पासून ‘ध’ पर्यंतचा मोठा पल्ला येतो आणि अंतराचा भास केवळ त्या स्वरांतरामुळे नाही तर ‘फासला’ शब्दाच्या उच्चारातही गाठला जातो. हे महत्त्वाचं!

के आज हौसलो में है बला की गर्मियाँ !

याहून सुंदर, याहून संयत, याहून ग्रेसफुल शारीर आकर्षण शब्दात उमटणं खरंच कठीण आणि त्याहून ती धग स्वरांत पकडणं दुरापास्तच. रफीसाहेबांचा ‘गर्मियाँ ’ शब्दाचा उच्चार खूप काही सांगून जातो. शायरीच्या पलीकडे जाऊन गायक गळय़ातून जे व्यक्त करू शकतो, ते हेच!

‘चल उड जा रे पंछी’ लिहिताना राजेंद्र कृष्णांची लेखणी हळवी आणि कठोरही झाली. जिथे जीव रमला, तिथून निघून जाणं हे वेदनादायीच. एक आशियाना निर्माण करणं, उन्हापावसाची पर्वा न करता ती बाग शिंपणं आणि एके दिवशी हे सगळं सोडून जाणं या यातना कुणाला सांगायच्या? आणि आता इथलं काही नकोच मला. उलट काही तरी देऊनच जाईन मी! कोण जाणे पुन्हा येईन की नाही? गलबलून टाकतं हे गाणं. काळजाचे धागे असे तोडून निघणं.. मग ते गाव.. जन्मभूमी, जिवलग असो.. हे इथलं आयुष्यच असो.. किती दाहक दु:ख आहे हे? किती दिशांनी हे गाणं भिडतं! दुनिया, रैन बसेराच आहे शेवटी. हे जग एके दिवशी ‘बेगाना’ ठरवून तुला पाय काढावाच लागणार आहे. आपणच वाढवलेला पसारा क्षणात आवरता येतच नसतो. ‘रोते है ये पंख पखेरू.. साथ तेरे जो खेले!.. जीव लावलास, पण तो काढताही आला पाहिजे वेळ आल्यावर! मनाचं हे पाखरू.. किती गुंतलं.. त्याला आता पुढच्या अवकाशात झेप घ्यायलाच हवी ना? रफी हे गाणं अक्षरश: जगलाय. सुरुवातीचा तो ‘चल’ इतका खिन्न, पडलेला.. त्यात पराभव आहे, इच्छेविरुद्ध निघण्याचा भाव आहे. उत्साही ‘चल’ वेगळा असतो. हा ‘चल’ खूप उदास! कुठल्या कुठल्या, मनाविरुद्ध घर, जन्मभूमी, कर्मभूमी सोडण्याच्या जखमांवर आत्ता कुठे खपली धरलेली असताना अशा गाण्यांनी ती निघते आणि भळभळा रक्त वाहायला लागतं.

चित्रगुप्त हे एक अनसंग हिरो unsung hero! ‘अनाम वीर! स्तंभ तिथे ना कुणी बांधला, पेटली न वात’ असं त्यांच्या बाबतीत झालं. पौराणिक आणि हाणामारीच्या चित्रपटांपासून सुरू झालेली कारकीर्द प्रथम दर्जाच्या चित्रपटांना आणि अतिशय उत्तम काव्यमूल्य असलेल्या गाण्यांना संगीत देण्यापर्यंत नेणं ही सोपी गोष्ट नाही. चित्रगुप्तनी ते करून दाखवलं. भोजपुरी चित्रपटांसाठीही भरपूर काम केलं. ओ. पी. नय्यर, शंकर- जयकिशन, लक्ष्मीकांत -प्यारेलाल यांसारखी वादळं आली, त्यामुळे ही ज्योत किंचित थरथरली, पण विझली मात्र नाही. कारण चित्रगुप्तची मेलडी एका रात्रीत हवा निर्माण करणारी नव्हती, तशीच एका रात्रीत विसरली जाणारीसुद्धा नव्हती! हा कप्पाच वेगळा. या परीकथेतली पात्रंच वेगळी, यातली लता वेगळी, तिचा आवाज वेगळा. त्यांचा या मदनमोहन, शंकर-जयकिशन आदींनी व्यापलेल्या जगाशी काही संबंधच नाही. ‘विजयासाठी कविता माझी कधीच नव्हती, म्हणून नव्हती भीती तिजला पराजयाची’ असं चित्रगुप्तांच्या बाबतीत म्हणावंसं वाटतं. १४ जानेवारी १९९१ या दिवशी चित्रगुप्तांनी या जगाचा निरोप घेतला; पण आनंद मिलिंद या पुत्रद्वयाचं, ‘कयामत से कयामत तक’ या चित्रपटाच्या संगीताचं तुफान यश बघूनच..

एक अत्यंत शांत, सात्त्विक, स्वत:चं काम चोखपणे करणारा, फक्त श्रवणीयच संगीत जन्माला घालणारा हा संगीतकार मनाचा दीप तेजाळून गेला!

सोये नगमे जाग उठे, होटोंकी शहनाई में

दिल का दिया जलाके गया, ये कौन मेरी तन्हाईमें.!

mrudulasjoshi@gmail.com

The post दिल का दिया जलाके गया.. appeared first on Loksatta.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#दल #क #दय #जलक #गय

RELATED ARTICLES

यूजर्सच्या गोपनीयतेचा केला भंग, ट्विटरला 15 कोटी डॉलर्सचा दंड

Fine On Twitter: मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरवर आपल्या वापरकर्त्यांच्या गोपनीयतेचा भंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे ट्विटरला 15...

बॅकलेस ड्रेस घालून Karan Johar च्या पार्टीत पोहचली Ananya Panday

.सध्या बी-टाऊनमध्ये जर कशाची चर्चा होत असेल तर ती म्हणजे करण जोहरच्या बर्थडे पार्टीची अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते...

मालकाच्या Work From Home मुळे आजारी पडली मांजर; डॉक्टरांनी सांगितलं शॉकिंग कारण

लंडन, 26 मे : कोरोना काळात बऱ्याच लोकांनी वर्क फ्रॉम होम (Work from home side effect) केलं. काही ऑफिसेस आता सुरळीत झाले असले तर...

Most Popular

सरनाईक, राऊत अन् परब…; आतापर्यंत शिवसेनेचे कोणते नेते ईडीच्या रडारवर?

Maharashtra And ED Conection : गेल्या काही दिवसांपासून राज्यात राज्य सरकार विरुद्ध केंद्रीय तपास यंत्रणा हा सामना रंगल्याचं...

बॅकलेस ड्रेस घालून Karan Johar च्या पार्टीत पोहचली Ananya Panday

.सध्या बी-टाऊनमध्ये जर कशाची चर्चा होत असेल तर ती म्हणजे करण जोहरच्या बर्थडे पार्टीची अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते...

करण जोहरच्या बर्थडे पार्टीत गर्लफ्रेंड सबासह हृतिकची एंट्री, हातात हात घेऊन दिली रोमँटिक पोज

मुंबई: फिल्ममेकर करण जोहर (Karan Johar Birthday) याने २५ मे रोजी त्याचा ५०वा वाढदिवस साजरा केला. दरम्यान बॉलिवूडच्या या बड्या फिल्ममेकरच्या वाढदिवसाची पार्टीही...

हेमांगीला विदाआऊट मेकअप पाहून नेटकऱ्यांनी केली अजब मागणी, अभिनेत्री म्हणाली…

मुंबई, 25 मे- अभिनेत्री हेमांगी कवी ( Hemangi Kavi) सोशल मीडियार प्रचंड सक्रीय असते. हेमांगी विविध विषयावर सोशल मीडियावर व्यक्त होत असते. तिचं...

ED Raids On Anil Parab : परिवहन मंत्री अनिल परब यांच्या निवासस्थानी ईडीचा छापा

ED Raids On Anil Parab : राज्याचे परिवहन मंत्री आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय अनिल परब यांच्या...

LIVE : हाताला काळ्या फिती, डोळ्यांमध्ये संताप, शिवसैनिक अनिल परबांच्या घराबाहेर

मुंबई, 26 मे : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांचे विश्वासू सहकारी अशी ख्याती असलेले राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Anil...