’या’ शहरात पाणी प्रश्न पेटला; मनसेकडून अनोखं आंदोलन तर भाजपही उतरणार रस्त्यावर

औरंगाबाद: आशिया खंडात सर्वाधिक वेगाने वाढणारे शहर अशी ओळख असलेलं तथा मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद शहरात पाणी प्रश्न गंभीर झाला असून, यावरून राजकीय वातावरण सुद्धा पेटताना पाहायला मिळत आहे. मनसेकडून आज ( शनिवारी ) ‘पाणी संघर्ष यात्रा’ काढण्यात आली आहे. तर 23 मे रोजी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली शहरात भव्य असा मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यामुळे औरंगाबाद शहरातील पाणी प्रश्न पुन्हा एकदा पेटताना पाहायला मिळत आहे.

शहरातील अनेक भागात नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत असून,आठ-आठ दिवस नळाला पाणी येत नसल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे मनसेकडून आज सकाळी 10 वाजेच्या सुमारास शहरातील टीव्ही सेंटर भागातील पवन नगर येथून ‘पाणी संघर्ष यात्रा’ काढण्यात आली. यावेळी मनसेच्या पदाधिकऱ्यांनी घरोघरी जाऊन पाणी समस्याबाबत मुख्यमंत्री यांना पत्र लिहण्याचे आवाहन केले. तसेच संपूर्ण शहरातून तब्बल 25 हजार पत्र जमा करून मुख्यमंत्री यांना पाठवणार असल्याची माहिती मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर यांनी दिली आहे.

भाजपही उतरणार रस्त्यावर

औरंगाबाद शहरात निर्माण झालेल्या पाणी प्रश्नावरून भाजपकडून 23 मे रोजी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली शहरातील पैठण गेट ते महानगरपालिका कार्यालयापर्यंत भव्य असा मोर्चा काढला जाणार आहे. गेल्या 22 वर्षांपासून औरंगाबाद महानगर पालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. तसेच 1999 पासून तर 2014 पर्यंत जिल्ह्याचे खासदारपद सुद्धा सेनेकडच होते. पण तरीही एवढ्या वर्षात पाणी प्रश्न सुटला नाही. त्यामुळे भाजपकडून शिवसेनेला घेरण्याचा प्रयत्न केला जात आहे.

आयुक्तांवर हल्ला

औरंगाबाद शहरातील पाणी प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचा प्रशासना विरोधात मोठा संताप पाहायला मिळतोय. तर पाणी प्रश्नावरून नागरी प्रशासकीय अधिकाऱ्यांविरोधात आक्रमक होताना सुद्धा पाहायला मिळत असून, याचा प्रत्यय शुक्रवारी औरंगाबाद महानगरपालिका कार्यालयात पाहायला मिळाला. पाणी प्रश्नाबाबत निवेदन देण्यासाठी आलेल्या काही लोकांनी थेट मनपा आयुक्त आस्तिक कुमार पांडे यांच्यावर हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे लोकांचा संयम सुटत चालला असून, वेळीच पाण्याचा प्रश्न मार्गी लागला नाही तर यापेक्षाही परिस्थिती गंभीर होऊ शकते हे मात्र खरं आहे.

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]
#औरगबद #शहरत #पण #परशन #पटल #रजकय #पकष #आकरमक #लकचह #सयम #सटल